‘फिजिओ गणेशा’तून आरोग्य व जनजागृतीचा संदेश
‘फिजिओ गणेशा’तून आरोग्य व जनजागृतीचा संदेश
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत विविध उपक्रम; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
![]() |
| लेवाजगत न्यूज मार्फत प्रसिद्धी |
जळगाव : डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगाव येथे १४ ते २० सप्टेंबरदरम्यान ‘फिजिओ गणेशा’ गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा व मनोरंजनात्मक उपक्रमांसोबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती आणि सांघिक भावनेचा संदेश देण्यात आला.
१४ सप्टेंबर रोजी श्री गणेशाची विधिवत स्थापना करून उत्सवाला सुरुवात झाली. पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या सहभागाने आरती करण्यात आली. १५ सप्टेंबर रोजी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अंतर्गत क्रीडा दिनाचे आयोजन केले. संगीत खुर्ची, कागदी नृत्य, फुग्याचा समतोल, रस्सीखेच आदी खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
१६ सप्टेंबर रोजी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी खजिना शोध, रॅम्प वॉक आणि फॅशन शोचे आयोजन केले. १७ सप्टेंबर रोजी सत्यनारायण पूजा, महाप्रसाद, आरती व भजनाचा कार्यक्रम झाला. १८ सप्टेंबर रोजी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ‘न्यूरो निंजा’, अंताक्षरी तसेच विविध मनोरंजक खेळांचे आयोजन केले. १९ सप्टेंबर रोजी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी भजन स्पर्धा आणि कार्यपूर्ती खेळ घेतले.
२० सप्टेंबर रोजी आरतीनंतर गणेशमूर्तीची भक्तिभावाने मिरवणूक काढण्यात आली. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
या उत्सवामुळे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये एकता, सांघिक भावना, सहकार्य आणि आपलेपणाची भावना वृद्धिंगत झाली. विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच सामाजिक आणि आरोग्यविषयक जनजागृतीलाही चालना मिळाली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत