डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक महाविद्यालयात ‘संस्कृत सप्ताह’ उत्साहात विविध स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव; संस्कृतच्या प्रसार-प्रचाराचा निर्धार
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक महाविद्यालयात ‘संस्कृत सप्ताह’ उत्साहात
विविध स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव; संस्कृतच्या प्रसार-प्रचाराचा निर्धार
लेवाजगत न्यूज जळगाव : येथील डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक महाविद्यालयात प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेचा वारसा जपणे, तसेच आयुर्वेदातील मूळ संस्कृत ग्रंथांचा विद्यार्थ्यांना परिचय करून देणे आणि संस्कृतचा प्रसार-प्रचार करण्याच्या उद्देशाने आयोजित ‘संस्कृत सप्ताहा’चा समारोप ५ सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडला.
सप्ताहभराच्या आयोजनात विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा व उपक्रम घेण्यात आले. यामध्ये संस्कृत संभाषण कार्यशाळा, श्लोक पठण स्पर्धा, प्रश्नमंजुषा, वक्तृत्व स्पर्धा आदी शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचा समावेश होता. या सर्व उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
समारोप कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. सुषमा खानापूरकर, राजश्री देशमुख, गोदावरी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सदस्य व हृदयरोगतज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले, डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद आठवले यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी संस्कृत ही केवळ एक भाषा नसून भारतीय ज्ञानपरंपरा आणि वैद्यकशास्त्राचा समृद्ध पाया असल्याचे प्रतिपादन केले. आयुर्वेदाच्या प्राचीन ग्रंथांमधील ज्ञान समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेचा अभ्यास करणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. अमीता निकम यांनी प्रास्ताविकातून संस्कृत सप्ताहाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. सप्ताहभर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत