हृदयासाठी औषधांसोबत व्यायामाचेही महत्त्व जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त डॉ. अमित जयस्वाल यांचा आरोग्यविषयक संदेश
हृदयासाठी औषधांसोबत व्यायामाचेही महत्त्व
जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त डॉ. अमित जयस्वाल यांचा आरोग्यविषयक संदेश
जळगाव, प्रतिनिधी : हृदय निरोगी ठेवण्यासाठी औषधोपचारांसोबत नियमित आणि योग्य पद्धतीचा व्यायामही अत्यंत महत्त्वाचा आहे. हृदयविकारानंतर सक्षम आयुष्य जगण्यासाठी व्यायाम हा उपचार प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग असून, फिजिओथेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली केलेले व्यायाम सुरक्षित आणि प्रभावी ठरतात, असे मत डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे प्राध्यापक डॉ. अमित जयस्वाल यांनी व्यक्त केले.
दरवर्षी ८ सप्टेंबर रोजी जागतिक फिजिओथेरपी दिन साजरा केला जातो. १९९६ मध्ये World Confederation for Physical Therapy (WCPT) ने ८ सप्टेंबर हा दिवस जागतिक फिजिओथेरपी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. फिजिओथेरपीचे क्षेत्र केवळ स्नायू व सांध्यांच्या समस्यांपुरते मर्यादित राहिलेले नसून बालरोग, हृदयरोग, शस्त्रक्रियेनंतरचे पुनर्वसन, श्वसनविकार, मणक्यांचे आजार तसेच वृद्धापकाळातील समस्यांमध्येही त्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
बदलती जीवनशैली, शारीरिक हालचालींचा अभाव, वाढते वजन, उच्च रक्तदाब, मधुमेह, धूम्रपान, ताणतणाव आणि अयोग्य आहारामुळे कमी वयातही हृदयविकाराचा धोका वाढत आहे. सतत बैठे काम करणे आणि शारीरिक हालचाल कमी असणे हे हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. नियमित व्यायामामुळे रक्तदाब, रक्तातील साखर, शरीराचे वजन आणि हृदय-श्वसन कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते.
वेगाने चालणे, सायकलिंग, पोहणे, जॉगिंग यांसारख्या एरोबिक व्यायामांसोबत स्नायू बळकटीकरणाचे व्यायामही आवश्यक आहेत. १८ ते ६४ वयोगटातील प्रौढांनी आठवड्याला १५० ते ३०० मिनिटे मध्यम तीव्रतेचा किंवा ७५ ते १५० मिनिटे अधिक तीव्रतेचा व्यायाम करावा, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद आहे.
हृदयविकारानंतर व्यायाम बंद करण्याची गरज नाही. हृदयविकाराचा झटका, अँजिओप्लास्टी किंवा बायपास शस्त्रक्रियेनंतर योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने सुरू केलेला व्यायाम कार्डियाक रिहॅबिलिटेशनचा महत्त्वाचा भाग आहे. या प्रक्रियेत व्यायामासोबत आहार, वजन नियंत्रण, मानसिक आरोग्य आणि जीवनशैलीतील बदलांवरही लक्ष दिले जाते.
रुग्णाची शारीरिक क्षमता, हृदयाची स्थिती, लक्षणे, औषधे, रक्तदाब, हृदयाची गती आणि दैनंदिन कार्यक्षमता यांचा विचार करून सुरक्षित व्यायाम कार्यक्रम तयार करण्यात फिजिओथेरपिस्ट महत्त्वाची भूमिका बजावतात. संशोधनानुसार, व्यायामाधारित कार्डियाक रिहॅबिलिटेशनमुळे हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात दाखल होण्याचा धोका तसेच हृदयविकाराशी संबंधित मृत्यूचा धोका कमी होण्यास मदत होते.
त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी व्यायाम हा केवळ पर्याय नसून दैनंदिन जीवनशैलीचा भाग असायला हवा. आपल्या क्षमतेनुसार व्यायामाची सुरुवात करून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्याची तीव्रता वाढवणे आवश्यक आहे. ‘हृदयासाठी व्यायामाला दिलेला वेळ हा खर्च नसून भविष्यातील आरोग्यातील गुंतवणूक आहे,’ असा संदेश डॉ. अमित जयस्वाल यांनी दिला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत