डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशनमध्ये ‘इग्नाईट–२०२६’ इंडक्शन सप्ताहाचा उत्साहात प्रारंभ
डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशनमध्ये ‘इग्नाईट–२०२६’ इंडक्शन सप्ताहाचा उत्साहात प्रारंभ
जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचलित व एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई संलग्नित डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन, जळगाव येथे बीसीए अभ्यासक्रमाच्या नवप्रवेशित विद्यार्थिनींसाठी ‘इग्नाईट–२०२६’ इंडक्शन (दीक्षारंभ) सप्ताहाचा उत्साहात प्रारंभ करण्यात आला.
नवीन विद्यार्थिनींना महाविद्यालयाचे शैक्षणिक वातावरण, अभ्यासक्रम, विविध सुविधा आणि उपक्रमांची सविस्तर माहिती मिळावी, यासाठी पाच दिवसांच्या या इंडक्शन सप्ताहात विविध विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहांतर्गत विद्यार्थिनींना महाविद्यालयाचा परिसर, संगणक प्रयोगशाळा, ग्रंथालय तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ विद्यार्थिनी, प्राध्यापक आणि नवप्रवेशित विद्यार्थिनी यांच्यात संवाद वाढवून मैत्रीपूर्ण व सकारात्मक वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे.
संगणक क्षेत्रातील भविष्यातील संधी, बदलते तंत्रज्ञान आणि त्यातील प्रगती याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थिनींमधील संकोच दूर करून त्यांचा आत्मविश्वास आणि उत्साह वाढविण्यासाठी विविध मनोरंजक खेळ व उपक्रमही घेण्यात येणार आहेत.
‘महिला सबलीकरण व भविष्याचे सक्षमीकरण’ या ध्येयाला अनुसरून विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, कौशल्ये आणि नेतृत्वगुण विकसित करणाऱ्या विविध उपक्रमांचा या सप्ताहात समावेश करण्यात आला आहे.
हा इंडक्शन सप्ताह महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. नीलिमा वारके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यक्रम समन्वयक प्रा. शिवानी महाजन यांच्या संयोजनाखाली आयोजित करण्यात येत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत