Contact Banner

गणेशोत्सव, दसरा, दीपावलीनिमित्त डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’

 

ganeshotsav-dussehra-diwali-dr-ulhas-patil-hospital-bhavya-arogya-sampada-shibir

गणेशोत्सव, दसरा, दीपावलीनिमित्त डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’

लेवाजगत न्यूज जळगाव : गणेश चतुर्थी, दसरा आणि दीपावलीच्या पार्श्वभूमीवर गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मादाय रुग्णालयाच्या वतीने ‘भव्य आरोग्य संपदा शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले आयुष्मान कार्ड, आयुष्मान कार्ड नसल्यास मूळ रेशन कार्ड तसेच आधार कार्ड सोबत आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






शिबिरांतर्गत हृदयरोग, मधुमेह, थायरॉईड, फुफ्फुसांचे आजार, किडनी विकार, ताप, सर्दी-खोकला, पोटाचे विकार, अ‍ॅसिडिटी, अपचन, रक्तक्षय, सांधेदुखी, कावीळ आदी आजारांसाठी बाह्यरुग्ण विभागाची सुविधा उपलब्ध आहे. तसेच डायलिसिस, ब्रॉन्कोस्कोपी, एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी आणि २-डी इको कार्डिओग्राफी यांसारख्या आधुनिक तपासणी व उपचार सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

अंतर्गत रुग्ण विभागात दमा, न्यूमोनिया, क्षयरोग, फुफ्फुसांचे आजार, हृदयविकाराचा झटका, छातीत दुखणे, श्वसनविकार, अपघात व दुखापती, स्ट्रोक, विषबाधा, साप-विंचू दंश, बेशुद्धावस्था, फिट्स, कोमा तसेच ताप, संसर्ग आणि सेप्सिस यांसारख्या आपत्कालीन स्थितींवर उपचाराची सुविधा उपलब्ध आहे.

तपासण्या व औषधोपचारात विशेष सवलत

शिबिराच्या कालावधीत रुग्णांना आवश्यक तपासण्या व औषधोपचारांमध्ये विशेष सवलत देण्यात येणार आहे. रुग्णवाहिका समन्वय सेवा, व्हेंटिलेटर, क्रिटिकल केअर आणि अत्याधुनिक आयसीयू सुविधाही उपलब्ध आहेत. रुग्णालयात दाखल होण्यासाठी आवश्यक रक्ताची तयारी मोफत करून दिली जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

शिबिरात डॉ. युवराज बढे, डॉ. रोशन राजपूत यांच्यासह विविध वैद्यकीय विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांना उपचार व मार्गदर्शन केले जाणार आहे. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन गोदावरी फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.