आमदार अमोल जावळे यांच्या प्रयत्नांना यश; यावल नगरपरिषदेला १.९६ हेक्टर जमीन मंजूर
आमदार अमोल जावळे यांच्या प्रयत्नांना यश; यावल नगरपरिषदेला १.९६ हेक्टर जमीन मंजूर
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासह विविध नागरी सुविधांसाठी मिळणार जागा
लेवाजगत न्यूज यावल : यावल शहरातील सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. शहरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) उभारण्यासाठी गट क्रमांक १२३३ मधील एकूण ९.२८ हेक्टर क्षेत्रापैकी १.९६ हेक्टर जमीन यावल नगरपरिषदेला उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी, जळगाव यांनी दिले आहेत.
नगरोत्थान महाअभियान व स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.० अंतर्गत सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी १.२५ हेक्टर, तर जलशुद्धीकरण केंद्रासाठी ०.७१ हेक्टर, अशी एकूण १.९६ हेक्टर जमीन नगरपरिषदेला प्राप्त झाली आहे.
या जागेवर मलजल प्रक्रिया केंद्र (STP), संबंधित संरचना, मलजल वाहिनीचे जाळे तसेच नाला अडवणे व वळवणे (Interception & Diversion) यासह आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे शहरातील सांडपाणी नद्यांमध्ये मिसळून होणारे जलप्रदूषण रोखण्यास मदत होणार असून, पर्यावरण संवर्धनालाही मोठी चालना मिळणार आहे.
यावल शहरातील भुयारी गटार योजनेसाठी १२५ कोटी रुपयांची तांत्रिक मान्यता यापूर्वीच प्राप्त झाली आहे. या योजनेतील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे काम स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.० अंतर्गत प्रथम टप्प्यात करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक जमीन उपलब्ध होणे हा या योजनेतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
या संपूर्ण प्रक्रियेसाठी आमदार अमोल जावळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने यावल शहराच्या सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांना स्वच्छ व निरोगी वातावरण मिळण्यास मदत होणार आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत