Contact Banner

गोदावरी कॅम्पसच्या राजाला भावपूर्ण निरोप; विसर्जन सोहळा उत्साहात

 

godavari-campus-cha-raja-ganesh-visarjan-jalgaon

गोदावरी कॅम्पसच्या राजाला भावपूर्ण निरोप; विसर्जन सोहळा उत्साहात





लेवाजगत न्यूज जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च आणि डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन, जळगाव येथे विराजमान झालेल्या ‘गोदावरी कॅम्पसच्या राजा’ला भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषात श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

यावेळी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती करण्यात आली. गणेशभक्तांसाठी महाविद्यालयात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

गणेशोत्सवाच्या कालावधीत महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी हरिश्चंद्रगडावरील प्रसिद्ध केदारेश्वर गुहा मंदिराचा आकर्षक देखावा साकारला होता. या देखाव्याला गणेशभक्त तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

विशेष म्हणजे, गोदावरी फाउंडेशन आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईट यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘सहयोग निधी प्रकल्पा’ला विद्यार्थिनी तसेच नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रकल्पांतर्गत श्री गणेशमूर्तींच्या विक्रीतून जमा झालेला निधी अनाथ मुलांच्या संगोपन, शिक्षण आणि कल्याणासाठी सुपूर्द करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवाला भक्तीबरोबरच सामाजिक संवेदनशीलतेचीही जोड मिळाली.

विसर्जन मिरवणुकीत महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके, डॉ. निलीमा वारके, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. ढोल-ताशांचा निनाद, गणरायाचा जयघोष आणि भक्तिमय वातावरणात विसर्जन मिरवणूक उत्साहात पार पडली.

विद्यार्थिनींची सर्जनशीलता, सामाजिक बांधिलकी आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या ‘गोदावरी कॅम्पसच्या राजा’च्या गणेशोत्सवाची उत्साहपूर्ण सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.