Contact Banner

गोदावरीच्या विविध संस्थांमध्ये शिक्षक दिन उत्साहात डॉ. वर्षा पाटील कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन कॉलेज, गोदावरी आयएमआर व होम सायन्स महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन

 


गोदावरीच्या विविध संस्थांमध्ये शिक्षक दिन उत्साहात

डॉ. वर्षा पाटील कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन कॉलेज, गोदावरी आयएमआर व होम सायन्स महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन

लेवाजगत न्यूज जळगाव : गोदावरी फाऊंडेशन संचलित विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त विविध महाविद्यालयांमध्ये त्यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली.

डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनमध्ये शिक्षक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व पूजन करून झाली.


godavari-foundation-various-institutions-teachers-day-celebration-jalgaon


यावेळी प्रा. लीना पाटील यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतील शिक्षकांचे स्थान तसेच नैतिक मूल्यांचे महत्त्व विशद केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. नीलिमा वारके यांनी शिक्षक हे जीवनातील ज्ञानाचे दीपस्तंभ असल्याचे सांगितले. आई-वडिलांनंतर योग्य मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव देणे, विचारांना योग्य दिशा देणे आणि त्यांचे भविष्य घडविण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन प्रा. शिवानी महाजन यांनी केले.

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमध्ये शिक्षक दिन

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (आयएमआर) येथेही शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी प्रा. लीना पाटील यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याची माहिती देत विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित केले. आधुनिक युगात नैतिक मूल्ये जपण्याचे आवाहनही त्यांनी केले.

संस्थेचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी शिक्षक हा समाज घडविणारा मुख्य घटक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानासोबतच व्यावहारिक कौशल्ये आणि उत्तम संस्कार आत्मसात करून आदर्श नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. स्मिता चौधरी यांनी शिक्षकांप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करत आभार मानले.

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये विविध उपक्रम

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्समध्येही शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.

शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थिनींनी शिक्षकांसाठी विविध मनोरंजनात्मक गेम्सचे आयोजन केले होते. सर्व शिक्षकांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमाचा आनंद घेतला. विद्यार्थिनींनी शिक्षकांविषयी आपले मनोगत व्यक्त करून शिक्षकांप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त केली.

महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. कविता देशमुख यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात परिचय करून दिला. डॉ. नदीम शेख यांनीही डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. कु. ओजल जावळे हिने सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर मीनल राणे, एनएसएस ऑफिसर प्रा. जयश्री कुलकर्णी, प्रा. कोमल भालेराव आणि ग्रंथपाल कविता भोरटके यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

गोदावरीच्या अन्य संस्थांमध्येही शिक्षक दिन साजरा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, डॉ. उल्हास पाटील कृषी, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, अन्न व तंत्रज्ञान, डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथी महाविद्यालय तसेच डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय येथेही शिक्षक दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.