Contact Banner

जागतिक हृदय दिनानिमित्त गोदावरी नर्सिंगमध्ये जीवनरक्षक कौशल्य कार्यशाळा बीएलएस, एसीएलएस व पीएलएस प्रशिक्षणातून आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रात्यक्षिक

 


जागतिक हृदय दिनानिमित्त गोदावरी नर्सिंगमध्ये जीवनरक्षक कौशल्य कार्यशाळा

बीएलएस, एसीएलएस व पीएलएस प्रशिक्षणातून आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रात्यक्षिक


Lewajagat


लेवाजगत न्यूज जळगाव : जागतिक हृदय दिनानिमित्त ‘Don’t Miss a Beat’ या संकल्पनेवर आधारित बेसिक लाईफ सपोर्ट (BLS), अ‍ॅडव्हान्स्ड कार्डियाक लाईफ सपोर्ट (ACLS) आणि पीडियाट्रिक लाईफ सपोर्ट (PALS) या विषयांवरील दोन दिवसीय प्रगत जीवनरक्षक कौशल्य कार्यशाळेचे आयोजन गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे करण्यात आले.

वैद्यकीय-शल्य परिचर्या विभाग व नर्सिंग फाउंडेशन विभागाच्या वतीने ग्लोरियस इंटरनॅशनल नर्सिंग रिसर्च अँड अ‍ॅकॅडमिक फाउंडेशन यांच्या सहकार्याने २८ व २९ सप्टेंबर रोजी डॉ. अक्षता पाटील सभागृहात ही कार्यशाळा पार पडली.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट, डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जळगाव), प्राचार्य डॉ. विशाखा गणवीर तसेच उपप्राचार्य प्रा. जॅसिंथ धया यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. वैभव पाटील यांनी हृदयविकाराच्या आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर हस्तक्षेप, त्वरित पुनर्जीवन प्रक्रिया आणि प्रभावी टीमवर्कचे महत्त्व स्पष्ट केले.

कार्यशाळेसाठी एसएचटी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन, एआयएमएस फाउंडेशन, डोंबिवली (पूर्व) येथील सहयोगी प्राध्यापक रुबिना कॅम्बेल तसेच पारुल इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, पारुल युनिव्हर्सिटी, वडोदरा येथील सहयोगी प्राध्यापक व एएचए बीएलएस प्रशिक्षक स्टेफी अब्राहम यांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत एएलएस, बीएलएस, पीएलएससोबत एईडीचा वापर, कार्डियाक अरेस्ट अल्गोरिदम, ईसीजी, टॅकीकार्डिया व ब्रॅडीकार्डिया व्यवस्थापन, पोस्ट-कार्डियाक अरेस्ट केअर, मेगा-कोड सिम्युलेशन, चोकिंग व्यवस्थापन, एअरवे मॅनेजमेंट आणि अम्बु-बॅग-मास्क व्हेंटिलेशन याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.

तसेच कार्डियाक अरेस्टची रिव्हर्सिबल कारणे, आपत्कालीन परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याचे कौशल्य, मॅनिकिनवर प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, परिस्थितीआधारित सराव, अल्गोरिदम-आधारित प्रशिक्षण आणि डीब्रीफिंग सत्रांमुळे सहभागींच्या आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याच्या व्यावहारिक कौशल्यांना बळकटी मिळाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पियुष डी. वाघ, सहयोगी प्राध्यापक व विभागप्रमुख, फंडामेंटल ऑफ नर्सिंग विभाग यांनी केले. प्रा. मनोरमा कश्यप, प्राध्यापक व विभागप्रमुख, वैद्यकीय-शल्य परिचर्या विभाग यांनी जागतिक हृदय दिनाच्या ‘Don’t Miss a Beat’ या संकल्पनेची माहिती दिली.

वेळेवर आजाराची ओळख, त्वरित उपचार, कौशल्यपूर्ण पुनर्जीवन आणि प्रभावी टीमवर्क यांचे महत्त्व अधोरेखित करत या दोन दिवसीय जीवनरक्षक कौशल्य कार्यशाळेची यशस्वी सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.