जामनेरात २८ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू; नातेवाईकांकडून सखोल चौकशीची मागणी
जामनेरात २८ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू; नातेवाईकांकडून सखोल चौकशीची मागणी
लेवाजगत न्युज जामनेर(नितीन इंगळे ) : शहरातील शास्त्रीनगर भागातील २८ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. २० सप्टेंबर) घडली. बबलू देविदास वाणी असे मृत तरुणाचे नाव आहे. त्यांना मारहाण करून फरफटत नेण्यात आल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास काही व्यक्तींनी बबलू वाणी यांना जखमी अवस्थेत रिक्षातून जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणून दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्याचा निर्णय घेतला. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
मृत्यूनंतर बबलू वाणी यांचा मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. दरम्यान, मृताच्या पायावर तसेच उजव्या पृष्ठभागावर फरफटत नेल्यासारख्या जखमा आढळल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा मृत्यू संशयास्पद असल्याचा दावा करत त्यांनी मारहाणीची शक्यता व्यक्त केली आहे.
दरम्यान, जखमी बबलू वाणी यांना रुग्णालयात घेऊन आलेले व्यक्ती कोण होते, रिक्षा कोणाची होती, त्यांना नेमके कुठून आणि कोणत्या परिस्थितीत रुग्णालयात आणण्यात आले, याबाबतही पोलिसांनी तपास करावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण तसेच घटनेमागील परिस्थितीचा तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
बबलू वाणी यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे कुटुंबीयांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, या घटनेचे नेमके सत्य पोलिसांच्या तपासातून समोर येण्याची प्रतीक्षा आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत