Contact Banner

नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची स्वाक्षरी अनिवार्य नाही; अंतिम अधिकार मुख्याधिकाऱ्यांकडे

 

namuna-64-var-nagaradhyakshanchi-svakshari-anivarya-nahi-mukhyaadhikaryankade-antim-adhikar

नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची स्वाक्षरी अनिवार्य नाही; अंतिम अधिकार मुख्याधिकाऱ्यांकडे





वृतसंस्था मुंबई : नगरपालिकांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची स्वाक्षरी आवश्यक आहे की नाही, याबाबतचा संभ्रम अखेर दूर झाला आहे. महाराष्ट्र अधिनियमातील २०१८ मधील दुरुस्तीमुळे नगराध्यक्षांच्या वित्तीय नियंत्रणाशी संबंधित तरतुदी वगळण्यात आल्याने नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची स्वाक्षरी घेणे बंधनकारक नसल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.

नगरविकास विभागाने यासंदर्भात नगरपालिका प्रशासन संचालनालयाला निर्देश दिले असून, राज्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायतींमध्ये नमुना क्र. ६४ बाबत एकसमान कार्यपद्धती लागू होणार आहे.

यापूर्वी काही नगरपालिकांमध्ये नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष या दोघांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जात होत्या, तर काही ठिकाणी केवळ मुख्याधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने बिलाची प्रक्रिया पूर्ण केली जात होती. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर संभ्रम निर्माण झाला होता.

२०१३ मध्ये अधिसूचित लेखा संहितेत नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांसोबत नगराध्यक्षांची स्वाक्षरी घेण्याची तरतूद होती. त्यानंतरच्या कायदेशीर व न्यायालयीन प्रक्रियेमुळे या विषयावर अनिश्चितता कायम होती. मात्र, ३१ मार्च २०१८ रोजी महाराष्ट्र अधिनियमात झालेल्या दुरुस्तीने नगराध्यक्षांच्या वित्तीय नियंत्रणाशी संबंधित तरतुदी वगळण्यात आल्या.

तसेच, १६ जुलै २०२६ रोजी उच्च न्यायालयाने संबंधित याचिका निकाली काढल्याने २०१६ मधील स्थगिती आदेशही संपुष्टात आला आहे. त्यामुळे सध्याच्या कायदेशीर स्थितीनुसार नमुना क्र. ६४ वर अंतिम स्वाक्षरी करण्याचा अधिकार केवळ मुख्याधिकाऱ्यांकडे राहणार आहे.

संबंधित विभागप्रमुख बिल तयार करतील. त्यानंतर आवश्यक लेखापरीक्षण प्रक्रिया पूर्ण करून बिल मुख्याधिकाऱ्यांकडे सादर केले जाईल आणि मुख्याधिकारी त्यावर अंतिम स्वाक्षरी करतील.

नगराध्यक्षांच्या अधिकारांवर पुन्हा चर्चा

शासनाच्या या निर्णयामुळे लोकनियुक्त नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. नगरपालिकांच्या आर्थिक निर्णयप्रक्रियेत नगराध्यक्षांची भूमिका आणि त्यांचे उर्वरित अधिकार याबाबत राजकीय तसेच प्रशासकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

नमुना क्र. ६४ म्हणजे काय?

नगरपालिकेतील विकासकामे आणि इतर कामांची बिले अदा करण्यासाठी वापरले जाणारे नमुना क्र. ६४ हे अधिकृत लेखा प्रारूप आहे. त्यामध्ये कामाचा तपशील, बिलाची रक्कम आणि संबंधित आर्थिक माहिती नमूद केली जाते. बिलाची लेखापरीक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच्या अंतिम मंजुरीसाठी मुख्याधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेतली जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.