Contact Banner

फिजिओ गणेशा २०२६ ला भावूक वातावरणात निरोप ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक; ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने मेहरूण तलाव दुमदुमला

 

physio-ganesha-2026-bhavuk-vatavaranaat-nirop-jalgaon

फिजिओ गणेशा २०२६ ला भावूक वातावरणात निरोप

ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक; ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने मेहरूण तलाव दुमदुमला

जळगाव | प्रतिनिधी


Lewajagat


डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘फिजिओ गणेशा २०२६’ उत्सवाची भावूक वातावरणात सांगता झाली. मेहरूण तलाव येथे भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाचे विसर्जन करण्यात आले.

महाविद्यालयात श्री गणरायाची मनोभावे पूजा व आरती केल्यानंतर विद्यार्थ्यांनी जल्लोषात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात केली. ढोल-ताशांचा गजर, नृत्य आणि ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘एक-दोन-तीन-चार, गणपतीचा जयजयकार’ अशा जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

विद्यार्थ्यांनी उत्साहात मिरवणुकीत सहभाग घेत बाप्पाच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय केले. मात्र, विसर्जनाची वेळ जवळ येताच आनंदाच्या वातावरणाला भावूकतेची किनार लाभली. लाडक्या बाप्पाला निरोप देताना अनेक विद्यार्थी भावूक झाले. जड अंतःकरणाने, भरलेल्या डोळ्यांनी आणि गणरायासोबतच्या असंख्य आठवणींनी विद्यार्थ्यांनी बाप्पाला निरोप दिला.

मेहरूण तलाव येथे गणरायाचे विधिवत विसर्जन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ या जयघोषाने ‘फिजिओ गणेशा २०२६’ ची भावपूर्ण सांगता झाली.

हा संपूर्ण कार्यक्रम महाविद्यालयीन विद्यार्थी परिषदेने प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर आणि प्रशासकीय अधिकारी श्री. राहुल गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीतपणे पार पाडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.