सावद्यात शांतता समितीची बैठक; गुलालाऐवजी गुलाबपाकळ्यांची उधळण करण्याचे आवाहन
सावद्यात शांतता समितीची बैठक; गुलालाऐवजी गुलाबपाकळ्यांची उधळण करण्याचे आवाहन
लेवाजगत न्यूज सावदा -
सावदा : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह गणेशोत्सव शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यासाठी सावदा पोलीस ठाण्याच्या वतीने जेहरा मॅरेज हॉल येथे शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि शांतता कायम राखण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
बैठकीस जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील, सावदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश फड, पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, लोकनियुक्त नगराध्यक्षा रेणुका पाटील, जेहरा मॅरेज हॉलचे संचालक शब्बीर हुसेन अख्तर हुसेन बोहरी, सामाजिक कार्यकर्ते गजानन ठोसरे, नगरसेविका विजया जावळे, माजी उपनगराध्यक्ष नंदाबाई लोखंडे, महावितरणचे गणेश महाजन, कोल्हे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शांतता समितीचे सदस्य, गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
गुलालाऐवजी गुलाबपाकळ्यांची उधळण करा
बैठकीत मार्गदर्शन करताना अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनी गणेश मंडळांना गणेशोत्सवाच्या अनुषंगाने विविध महत्त्वाच्या सूचना दिल्या. श्री गणेशाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान गुलालाची उधळण करण्याऐवजी गुलाबपाकळ्यांची उधळण करावी, असे आवाहन त्यांनी केले.
गणेश मंडळांनी मंडळाच्या ठिकाणी तसेच परिसरात देखरेखीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. मिरवणुकीदरम्यान वाजविण्यात येणाऱ्या गाण्यांमुळे कोणत्याही धर्मीयांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची प्रत्येक मंडळाने दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
गणेशोत्सव हा सामाजिक जनजागृतीचा माध्यम म्हणून वापरावा. व्यसनमुक्तीचा संदेश देणारे विविध कार्यक्रम आयोजित करून युवकांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहनही गावित यांनी केले.
कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई
सावदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश फड यांनी गणेशोत्सवासह सर्व सण-उत्सव शांततेत पार पडण्यासाठी नागरिकांनी आणि गणेश मंडळांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
उत्सव साजरा करताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, याची सर्वांनी काळजी घ्यावी. कायदा मोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस निरीक्षक फड यांनी दिला.
यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा रेणुका पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, असलम सर, महावितरणचे गणेश महाजन यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
बैठकीस पत्रकार बांधव, विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, हिंदू-मुस्लिम समाजबांधव, शांतता समितीचे सदस्य, महिला दक्षता समितीच्या सदस्या, सर्व पोलीस पाटील तसेच मुस्लिम पंच कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक संजय महाजन यांनी केले, तर पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप यांनी उपस्थितांचे आभार मानले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत