Contact Banner

दिव्यांग व्यक्तीला विहिरीत उलटे लटकवून मारहाण; व्हिडिओ व्हायरल

 

yawal-disabled-man-assaulted-well-video-viral

दिव्यांग व्यक्तीला विहिरीत उलटे लटकवून मारहाण; व्हिडिओ व्हायरल

दहिगावातील धक्कादायक प्रकार; दोन संशयित अटकेत, तिसऱ्याचा शोध सुरू

yawal-disabled-man-assaulted-video-viral



यावल लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-

यावल तालुक्यातील दहिगाव येथे एका ५० वर्षीय दिव्यांग व्यक्तीला विहिरीजवळ नेऊन अमानुषपणे मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी यावल पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून, व्हिडिओ तयार करणाऱ्या तिसऱ्या साथीदाराचा शोध सुरू आहे.

दहिगाव येथील पाटील गल्लीतील रहिवासी नामदेव रामदास पाटील (वय ५०) यांनी यावल पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, २८ सप्टेंबर रोजी दुपारी साडेएक ते दोन वाजेच्या सुमारास काही जण त्यांना फिरण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन गेले.

त्यानंतर दहिगावपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर नावरा रस्त्यावरील एका विहिरीजवळ त्यांना नेण्यात आले. तक्रारीनुसार, नितीन उर्फ मुन्ना सुनील पाटील (वय २३) आणि पंकज उर्फ झग्या संतोष पाटील (वय २२), दोघे रा. दहिगाव, यांनी त्यांना विहिरीजवळ धोकादायक स्थितीत ठेवून मारहाण केली.

या प्रकारादरम्यान तिसरा साथीदार मोबाईलवरून घटनेचे चित्रीकरण करत होता. त्यानंतर संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी तत्काळ कारवाई करत नितीन उर्फ मुन्ना सुनील पाटील आणि पंकज उर्फ झग्या संतोष पाटील यांना अटक केली. तर व्हिडिओ तयार करणारा तिसरा संशयित अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे करीत आहेत. घटनेतील सर्व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.