Contact Banner

सावद्यात सार्वजनिक शौचालयासाठी वापरलेल्या जागेचा बाजारभावाने मोबदला द्या; बडगे परिवाराची मागणी नगराध्यक्षा रेणुका पाटील व मुख्याधिकारी भूषण वर्मा यांना निवेदन; सरकारी मोजणीनंतर तोडगा काढण्याचे आश्वासन

 

savda-public-toilet-land-compensation-market-rate-badge-family-demand

सावद्यात सार्वजनिक शौचालयासाठी वापरलेल्या जागेचा बाजारभावाने मोबदला द्या; बडगे परिवाराची मागणी

नगराध्यक्षा रेणुका पाटील व मुख्याधिकारी भूषण वर्मा यांना निवेदन; सरकारी मोजणीनंतर तोडगा काढण्याचे आश्वासन


Savda-Public-Toilet-Land-Compensation-Dilip-Badge


लेवाजगत न्यूज सावदा : सावदा शहरातील सार्वजनिक शौचालयासाठी वापरण्यात आलेल्या खासगी मालकीच्या जागेची आजच्या बाजारभावानुसार खरेदी करून योग्य मोबदला द्यावा, अशी मागणीमधुकर पुंजो बडगे व  दिलीप पुंजो बडगे यांनी केली आहे. यावेळी यांचे सोबत नगरसेवक विशाल तायडे उपस्थिती होते.यासंदर्भात सावदा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. रेणुका पाटील आणि मुख्याधिकारी भूषण वर्मा यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनानुसार, सावदा शिवारातील गट क्रमांक १३६३ मधील सुमारे ४९ आर क्षेत्राची जमीन अर्जदारांच्या मालकीची आहे. या जागेवर नगरपरिषदेकडून सार्वजनिक शौचालयाची सुविधा उभारण्यात आली असून, त्यासाठी एकूण ३३० चौरस मीटर क्षेत्र वापरण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यामध्ये महिलांसाठी ११० चौरस मीटर, तर पुरुषांसाठी २२० चौरस मीटर जागेचा समावेश असल्याचे अर्जात म्हटले आहे. सार्वजनिक सुविधेसाठी वापरण्यात आलेल्या या जागेची नियमानुसार पडताळणी करून सध्याच्या बाजारभावानुसार खरेदी करावी आणि जमीनमालकांना योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी बडगे परिवाराने केली आहे.

या निवेदनावर चर्चा करताना मुख्याधिकारी भूषण वर्मा यांनी अर्जदारांना प्रथम संबंधित जागेची शासकीय मोजणी करून घेण्यास सांगितले. शासकीय मोजणीनंतर जागेची वस्तुस्थिती स्पष्ट होईल आणि त्यानंतर या प्रकरणावर तोडगा काढण्यात येईल, असे त्यांनी अर्जदारांना सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विशाल तायडे, दिलीप पुंजो बडगे तसेच बडगे परिवारातील महिला सदस्य उपस्थित होत्या. त्यांनी नगराध्यक्षा सौ. रेणुका पाटील आणि मुख्याधिकारी भूषण वर्मा यांच्याकडे निवेदन सादर करून जागेचा योग्य मोबदला देण्याची मागणी केली.

आता संबंधित जागेची शासकीय मोजणी झाल्यानंतर या प्रकरणात काय निष्पन्न होते आणि नगरपरिषद प्रशासनाकडून कोणता निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.