Contact Banner

धनाजी नाना महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

 

dhanaji-nana-college-faizpur-vachan-prerana-din-2026

धनाजी नाना महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

फैजपूर लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-


dhanaji-nana-college-faizpur-vachan-prerana-din-2026


फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाच्या मध्यवर्ती ग्रंथालयाच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती आणि ‘भारतरत्न’ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘वाचन प्रेरणा दिन’ आणि विशेष प्रेरणादायी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थी व प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचा प्रारंभ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. डॉ. मनोहर सुरवाडे यांच्या हस्ते डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन आणि पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. त्यानंतर विशेष ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शनात डॉ. कलाम यांनी लिहिलेली पुस्तके, त्यांची चरित्रे तसेच विविध क्षेत्रांतील प्रेरणादायी आणि संदर्भग्रंथांची आकर्षक मांडणी करण्यात आली होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे ग्रंथपाल इरबा गंगाधर गायकवाड यांनी केले. आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात ग्रंथालयाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी डॉ. कलाम यांच्यासारखे उदात्त चारित्र्य आणि व्यापक जीवनदृष्टी घडविण्यासाठी सखोल वाचन आवश्यक असल्याचे सांगितले.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना उपप्राचार्य प्रो. डॉ. मनोहर सुरवाडे म्हणाले की, डॉ. अब्दुल कलाम यांचे संपूर्ण जीवन प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाची शिखरे कशी गाठता येतात, याचा आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवला आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या आभासी दुनियेत गुंतून न राहता नियमितपणे ग्रंथालयात यावे, वाचनाची सवय जोपासावी आणि डॉ. कलाम यांचे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमात पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थी तसेच प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले. उपस्थितांनी डॉ. कलाम यांच्या स्मृतींना अभिवादन करून ग्रंथ प्रदर्शनातील पुस्तकांचे अवलोकन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यास आणि ज्ञानवृद्धीला चालना मिळण्यास मदत झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रंथालय विभागातील कर्मचारी सहर्ष चौधरी, यामिनी पाटील आणि सुरेखा सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.