डॉ.केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा
डॉ.केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा
बालविवाह रोखण्यासह मुलींच्या हक्कांच्या संरक्षणाचा विद्यार्थ्यांनी दिला संदेश
लेवाजगत न्यूज जळगाव : डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथील जीएनएम द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी १० ऑक्टोबर रोजी विकास विद्यालयात आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त जनजागृतीपर उपक्रम राबविला. यावेळी बालविवाहाचे दुष्परिणाम, मुलींच्या हक्कांचे संरक्षण आणि मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारे प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले.
कार्यक्रमाला विकास विद्यालयाचे प्राचार्य युवराज पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘बालविवाह संपवा आणि मुलींच्या हक्कांमध्ये गुंतवणूक करा’ या संकल्पनेवर आधारित नाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षणावर, आरोग्यावर आणि भवितव्यावर होणारे विपरीत परिणाम मांडले. तसेच प्रत्येक मुलीला शिक्षणाच्या समान संधी मिळाव्यात आणि तिच्या अधिकारांचे संरक्षण व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमात जीएनएम द्वितीय वर्षाच्या एकूण ४० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. बालविवाहाला प्रतिबंध करणे, मुलींमध्ये त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी शिक्षणाला प्राधान्य देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी अंजू बुरघाटे यांनी केले, तर प्रसन्नता वेले यांनी आभार मानले.
याप्रसंगी डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्रसूती व स्त्रीरोग परिचर्या विभागप्रमुख प्राजक्ता सावरकर, व्याख्यात्या महेश्वरी बोंबळे व प्राजक्ता डाखोरे, तसेच ट्यूटर प्रिया खडसे, कीर्ती ढाले आणि सायली देशमुख उपस्थित होत्या.
मुलींच्या हक्कांचे संरक्षण, बालविवाहाचे निर्मूलन आणि प्रत्येक मुलीला शिक्षणासह समान संधी उपलब्ध करून देण्याचा संदेश देणारा हा उपक्रम माहितीपूर्ण व प्रेरणादायी ठरला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत