धनाजी नाना महाविद्यालयात टॅली सर्टिफिकेट कोर्सचे उद्घाटन
धनाजी नाना महाविद्यालयात टॅली सर्टिफिकेट कोर्सचे उद्घाटन
लेवाजगत न्यूज फैजपूर : धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथील वाणिज्य विभागातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासोबत रोजगाराभिमुख व व्यावहारिक कौशल्ये मिळावीत, या उद्देशाने टॅली सर्टिफिकेट कोर्सचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, सध्याच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी प्राप्त करणे पुरेसे नसून विषयाशी संबंधित आधुनिक तंत्रज्ञान व व्यावहारिक कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. विशेषतः वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी टॅली, जीएसटी व अकाउंटन्सीचे ज्ञान महत्त्वाचे असून, या कौशल्यांमुळे अकाउंटिंग, उद्योग, व्यवसाय, बँकिंग, करप्रणाली, कार्यालयीन व्यवस्थापन तसेच विविध व्यावसायिक क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
वाणिज्य शाखेची पदवी आणि त्यासोबत टॅली, जीएसटी व अकाउंटन्सीचे व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना भविष्यातील रोजगारासाठी अधिक सक्षम बनवू शकते, असे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी बदलत्या काळानुसार आपल्या कौशल्यांमध्ये सातत्याने भर घालावी, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाला वाणिज्य विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. रवी केसुर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी वाणिज्य विभागामार्फत विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासोबत व्यावहारिक ज्ञान व कौशल्ये मिळावीत यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
या टॅली सर्टिफिकेट कोर्सचे प्रशिक्षण डॉ. विवेक श्रावगे देणार असून, विद्यार्थ्यांना टॅली सॉफ्टवेअरसह अकाउंटिंग व जीएसटीशी संबंधित विविध व्यावहारिक बाबींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाच्या स्वरूपाची ओळख होण्यास मदत होणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. आरती भिडे, प्रा. आकाश तायडे आणि प्रा. यश भारंबे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत