Contact Banner

पडद्याआड सुरू होते आक्षेपार्ह प्रकार; रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल एम. जे. कॉलेज परिसरातील कॅफेवर दामिनी पथकाची कारवाई; चालक ताब्यात

 

पडद्याआड सुरू होते आक्षेपार्ह प्रकार; रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

एम. जे. कॉलेज परिसरातील कॅफेवर दामिनी पथकाची कारवाई; चालक ताब्यात

jalgaon-mj-college-heaven-cafe-police-action


jalgaon-mj-college-heaven-cafe-police-action


जळगाव, प्रतिनिधी : कॉलेज तरुण-तरुणींना आक्षेपार्ह प्रकार करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याच्या संशयावरून एम. जे. कॉलेज परिसरातील एका कॅफेवर दामिनी पथक व रामानंदनगर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत कॅफे चालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एम. जे. कॉलेज परिसरातील गजानन चेंबरमधील ‘हेवन कॅफे’मध्ये बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याची माहिती दामिनी पथकाला मिळाली होती. त्यानुसार महिला पोलिस कॉन्स्टेबल सुनीता जाधव, वैशाली माळी, अंजली राजपूत व रीना महाजन यांच्या पथकाने रामानंदनगर पोलिसांशी संपर्क साधला.

पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत, दामिनी पथकातील महिला अंमलदार व पंचांसह बुधवारी दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास कॅफेवर छापा टाकण्यात आला.

पोलिसांनी कॅफेत प्रवेश केला असता, सुमारे ३ बाय ३ आकाराचे प्लायवूडचे पार्टिशन व पडदे लावून अंधारे कंपार्टमेंट तयार करण्यात आल्याचे आढळले. तेथे काही अल्पवयीन तसेच महाविद्यालयीन मुले-मुली आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. संबंधितांना पंचांसमक्ष समज देऊन पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

कॅफेत खाद्यपदार्थच नव्हते

पोलिसांच्या तपासणीत कॅफेच्या दर्शनी भागात अधिकृत परवाना नसल्याचे आढळले. तसेच कॅफेमध्ये कॉफी पावडर, साखर, गॅस किंवा अन्य खाद्यपदार्थही उपलब्ध नसल्याचे पोलिसांनी नमूद केले.

या प्रकरणी कॅफे चालक विजय राजेंद्र पाटील (वय २९, रा. इंदिरानगर, खेडी, ता. जळगाव) याच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास रामानंदनगर पोलिस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.