धनाजी नाना महाविद्यालयात मराठी अभिजात भाषा दिन उत्साहात
धनाजी नाना महाविद्यालयात मराठी अभिजात भाषा दिन उत्साहात
मराठी विभागातील चार प्राध्यापकांच्या ग्रंथांचे प्रकाशन
लेवाजगत न्युज फैजपूर : येथील धनाजी नाना महाविद्यालयाच्या मराठी विभागात मराठी अभिजात भाषा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात मराठी भाषा, साहित्य आणि संशोधन क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे मराठी विभागप्रमुख डॉ. मनोहर सुरवाडे, प्रा. डॉ. शरद बिऱ्हाडे, डॉ. स्वाती महाजन आणि डॉ. उन्नती चौधरी यांच्या नव्या ग्रंथांचे प्रकाशन. उपस्थित मान्यवर डॉ. दीपक सूर्यवंशी, प्रा. विजय तायडे, प्रा. सीमा चौधरी आणि प्रा. नयना पाटील यांच्या हस्ते या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी वक्त्यांनी मराठी ही केवळ संवादाचे माध्यम नसून ज्ञान, संस्कृती आणि सामाजिक जडणघडणीचा महत्त्वपूर्ण आधार असल्याचे सांगितले. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी साहित्यवाचन, लेखन आणि संशोधनाकडे गांभीर्याने वळण्याची गरज असल्याचेही प्रतिपादन करण्यात आले.
या प्रसंगी मराठी विभागातील लेखकांनी आपल्या लेखनप्रवासाविषयी व लेखनप्रेरणांविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी तसेच साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी चारही ग्रंथकारांचे अभिनंदन करून त्यांच्या साहित्यनिर्मितीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय तायडे यांनी केले, तर डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत