तर्पण विधी करून परतताना अपघात; पित्याच्या अंत्यसंस्कारावेळी दुसऱ्या पुत्राचाही मृत्यू
तर्पण विधी करून परतताना अपघात; पित्याच्या अंत्यसंस्कारावेळी दुसऱ्या पुत्राचाही मृत्यू
नाशिक लेवजगत न्यूज प्रतिनिधी — तीन वर्षांपूर्वी निधन झालेल्या मुलाच्या तर्पण विधीसाठी बिहारमधील गया येथे गेलेल्या कुटुंबावर परतीच्या प्रवासात काळाने घाला घातला. उभ्या मालट्रकला कार धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात नाशिकचे प्रसिद्ध हिंग व्यापारी किरीटभाई ठक्कर (वय ६७) यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू असतानाच अपघातात गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या मुलगा कार्तिक ठक्कर (वय ३८) यांचाही मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनाक्रमामुळे ठक्कर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ठक्कर कुटुंबीय तीन वर्षांपूर्वी निधन झालेल्या मुलगा कृतिक यांच्या तर्पण विधीसाठी २६ सप्टेंबर रोजी गया-बोधगया येथे गेले होते. धार्मिक विधी पूर्ण केल्यानंतर ते गुजरातमधील अंजार या मूळ गावी गेले. तेथून नाशिककडे परतत असताना त्यांच्या कारची उभ्या असलेल्या मालट्रकला धडक बसली. या अपघातात किरीटभाई ठक्कर गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा कार्तिक यांच्यावर गंभीर अवस्थेत उपचार सुरू होते.
शुक्रवारी (२ ऑक्टोबर) किरीटभाई ठक्कर यांचे निधन झाले. शनिवारी (३ ऑक्टोबर) पंचवटी अमरधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरू असतानाच कार्तिक ठक्कर यांच्या निधनाची दुःखद बातमी समोर आली. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या नातेवाईकांवर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा मोठा आघात झाला.
किरीटभाई ठक्कर हे नाशिकमधील प्रसिद्ध हिंग व्यापारी म्हणून परिचित होते. दिंडोरी रोडवरील महालक्ष्मी सिनेमागृहामागील लोकसहकार नगर येथे ते पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडांसह राहत होते. तीन वर्षांपूर्वी मुलगा कृतिक यांच्या निधनाचे दुःख कुटुंबाच्या मनात ताजे असतानाच या अपघाताने आणखी मोठा आघात केला.
कार्तिक ठक्कर यांच्या पश्चात आई, पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. पितापुत्रांच्या एकापाठोपाठ झालेल्या निधनाने नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत