Contact Banner

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’चा जल्लोष नवरात्रोत्सवानिमित्त डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात रंगली दांडिया नाईट

 

godavari-college-of-nursing-garba-ni-goonj-dandiya-night-jalgaon

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’चा जल्लोष

नवरात्रोत्सवानिमित्त डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात रंगली दांडिया नाईट

जळगाव : गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे नवरात्रोत्सवानिमित्त दोन दिवसीय ‘गरबा नी गूंज – दांडिया नाईट’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. पारंपरिक वेशभूषा, आकर्षक रोषणाई आणि गरबा-दांडियाच्या तालावर थिरकणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे महाविद्यालयाचा परिसर भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणाने भारावून गेला.


godavari-college-of-nursing-garba-ni-goonj-dandiya-night-jalgaon


कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, फाउंडेशनचे सदस्य डॉ. अनिकेत पाटील आणि डॉ. सुहास बोरले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांचे पारंपरिक पद्धतीने फेटे बांधून स्वागत करण्यात आले. दीपप्रज्वलन आणि नवदुर्गा आरतीने कार्यक्रमाचा मंगलमय प्रारंभ झाला.

यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विशाखा गणवीर, उपप्राचार्या प्रा. जॅसिंथ धाया आणि प्रा. अश्विनी वैद्य यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षकवृंद उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक करत सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन दिले.

महाविद्यालयाचा परिसर आकर्षक रोषणाई आणि पारंपरिक सजावटीने सजविण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी पारंपरिक वेशभूषेत गरबा आणि दांडियाचे आकर्षक सादरीकरण केले. त्यांच्या नृत्यकौशल्यातून उत्साह, कलात्मकता आणि सांघिक भावनेचे दर्शन घडले.

गरबा आणि रील स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट गरबा सादरीकरणासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. याशिवाय ‘गरबा रील स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देऊन त्यांच्या कलागुणांचा सन्मान करण्यात आला.

आयोजनासाठी विशेष सहकार्य

या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन स्नेहल जांभुळकर, दिव्याना पवार, मंजिरी मडावी, सूरज खवाटे आणि सुमित भरांबे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरुण चौधरी आणि गणेश नांदुरकर यांनी मोलाचे सहकार्य केले.

सांस्कृतिक परंपरेतून व्यक्तिमत्त्व विकास

विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देणे, सांस्कृतिक परंपरांचे जतन करणे, आत्मविश्वास वाढविणे आणि सांघिक भावना वृद्धिंगत करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. शैक्षणिक प्रगतीसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला प्रोत्साहन देणारा हा सोहळा ठरला.

विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ‘गरबा नी गूंज – दांडिया नाईट’ हा दोन दिवसीय सांस्कृतिक सोहळा आनंददायी आणि अविस्मरणीय ठरला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.