गणेश भाऊ सपकाळे यांची भीम आर्मीच्या प्रदेश महासचिवपदी नियुक्ती
गणेश भाऊ सपकाळे यांची भीम आर्मीच्या प्रदेश महासचिवपदी नियुक्ती
उत्तर महाराष्ट्रासह नागपूर, बुलढाणा, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांची प्रभारी जबाबदारी
लेवाजगत न्यूज जळगाव : भीम आर्मी भारत एकता मिशनच्या संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने जळगाव जिल्ह्यातील गणेश भाऊ सपकाळे (भुरा भाऊ) यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांची संघटनेच्या प्रदेश महासचिवपदी तसेच उत्तर महाराष्ट्राच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच नागपूर, बुलढाणा, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांचे प्रभारी म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
भीम आर्मी भारत एकता मिशनचे संस्थापक भाई चंद्रशेखर आझाद आणि राष्ट्रीय प्रमुख भाई विनय रतन सिंह यांच्या नेतृत्वाखाली, तसेच महाराष्ट्राचे राज्य प्रमुख अशोक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे कार्य सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गणेश भाऊ सपकाळे यांच्याकडे सोपविण्यात आलेली नवी जबाबदारी संघटनात्मक दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचा प्रसार करणे, तसेच वंचित, शोषित आणि पीडित घटकांच्या हक्कांसाठी आवाज उठविणे ही संघटनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. नव्या जबाबदारीच्या माध्यमातून या कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये संघटनेची बांधणी मजबूत करणे, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविणे आणि सामाजिक प्रश्नांवर संघटनात्मक पातळीवर प्रभावी काम करणे, अशी आव्हाने नव्या जबाबदारीत महत्त्वाची ठरणार आहेत.
गणेश भाऊ सपकाळे यांच्या नियुक्तीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन व्यक्त केले जात असून, त्यांच्या पुढील सामाजिक आणि संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत