डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात ‘अॅनाटॉमी डे’ उत्साहात मॉडेल्स, बॉडी पेंटिंग, पीपीटी आणि रांगोळीतून विद्यार्थ्यांनी उलगडले मानवी शरीररचनेचे शास्त्र
डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात ‘अॅनाटॉमी डे’ उत्साहात
मॉडेल्स, बॉडी पेंटिंग, पीपीटी आणि रांगोळीतून विद्यार्थ्यांनी उलगडले मानवी शरीररचनेचे शास्त्र
लेवाजगत न्यूज जळगाव, दि. १५ ऑक्टोबर : गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, जळगाव येथे ‘अॅनाटॉमी डे’ विविध शैक्षणिक आणि सर्जनशील उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. वैभव पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी मानवी शरीररचनेविषयीचे ज्ञान विविध माध्यमांतून प्रभावीपणे सादर केले.
वैद्यकीय शिक्षणामध्ये शरीररचनाशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या विषयातील संकल्पना अधिक सहजपणे समजाव्यात, विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला व्यावहारिक अनुभवाची जोड मिळावी आणि त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळावे, या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमांतर्गत अॅनाटॉमी मॉडेल्स, बॉडी पेंटिंग, पीपीटी प्रेझेंटेशन आणि रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी मानवी शरीराची रचना, विविध अवयवांची वैशिष्ट्ये तसेच त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती आकर्षक पद्धतीने मांडली. वैज्ञानिक संकल्पना आणि कलात्मक अभिव्यक्ती यांचा सुंदर समन्वय साधत विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासातील ज्ञान, कल्पकता आणि सादरीकरण कौशल्य दाखवून दिले.
गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे व उपक्रमांचे कौतुक केले. अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांनी विषयाचे सखोल ज्ञान आत्मसात करून वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करावी, असे प्रोत्साहन त्यांनी दिले.
शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. उमाकांत चौधरी आणि डॉ. मयुरी चौधरी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कृतीशील शिक्षणामुळे विषयाची समज वाढण्यासोबतच निरीक्षणशक्ती, सर्जनशीलता आणि सादरीकरण कौशल्ये विकसित होतात, असे त्यांनी नमूद केले.
‘अॅनाटॉमी डे’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शरीररचनाशास्त्राचा अभ्यास अधिक रंजक आणि अनुभवाधारित पद्धतीने करण्याची संधी मिळाली. शैक्षणिक ज्ञानाला सर्जनशीलतेची जोड देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत