गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट औद्योगिक प्रक्रिया, आधुनिक तंत्रज्ञानासह गांधी विचारांचा घेतला अनुभव
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट
औद्योगिक प्रक्रिया, आधुनिक तंत्रज्ञानासह गांधी विचारांचा घेतला अनुभव
लेवाजगत न्यूज जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जळगाव येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी जैन व्हॅली येथील जैन फार्म फ्रेश फूड लिमिटेड तसेच जैन हिल येथील गांधी तीर्थ येथे औद्योगिक व शैक्षणिक भेट दिली.
विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यपद्धती, आधुनिक तंत्रज्ञान तसेच सामाजिक मूल्यांची माहिती मिळावी, हा या भेटीचा मुख्य उद्देश होता. जैन फार्म फ्रेश फूड लिमिटेड येथे विद्यार्थ्यांनी केळी, आंबा व मसाले प्लांटला भेट देऊन कृषी उत्पादनांवरील प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण, पॅकेजिंग तसेच आधुनिक यंत्रसामग्रीची कार्यपद्धती समजून घेतली. तसेच ऑटोमेशन, इलेक्ट्रॉनिक नियंत्रण प्रणाली, सेन्सर्स व कंट्रोल सिस्टमचा उद्योगांमध्ये कसा वापर केला जातो, याचे प्रत्यक्ष निरीक्षण केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी गांधी तीर्थला भेट देऊन महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याची तसेच स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या योगदानाची माहिती घेतली. सत्य, अहिंसा, स्वावलंबन, सामाजिक समता आणि राष्ट्रसेवा या गांधी विचारांचे महत्त्व विद्यार्थ्यांनी जाणून घेतले.
या शैक्षणिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना वर्गातील सैद्धांतिक ज्ञानाचा प्रत्यक्ष औद्योगिक प्रक्रियांशी संबंध जोडता आला. तसेच त्यांचे तांत्रिक आकलन, निरीक्षण क्षमता आणि व्यावसायिक कौशल्यांना चालना मिळाली.
यावेळी विभागाचे प्रा. डॉ. ईश्वर जाधव, प्रा. डॉ. देवेंद्र मराठे, प्रा. राजेंद्र पाटील तसेच प्रयोगशाळा सहाय्यक निर्भय नेमाडे उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत