Contact Banner

जळगावात संशयित ड्रोनच्या फेऱ्यांनी खळबळ खडसेंच्या फार्महाऊससह हतनूर धरण, डिफेन्स फॅक्टरी परिसरात हालचाली; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

 

jalgaon-suspected-drone-flights-khadse-hatnur-dam-defense-factory-high-level-inquiry

जळगावात संशयित ड्रोनच्या फेऱ्यांनी खळबळ

खडसेंच्या फार्महाऊससह हतनूर धरण, डिफेन्स फॅक्टरी परिसरात हालचाली; उच्चस्तरीय चौकशीची मागणी


jalgaon-suspected-drone-flights-khadse-hatnur-dam-defense-factory-high-level-inquiry


लेवा जगत न्यूज जळगाव, दि. ६ : जळगाव जिल्ह्यातील माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या फार्महाऊससह हतनूर धरण आणि वरणगाव येथील संवेदनशील डिफेन्स फॅक्टरी परिसरात संशयित ड्रोनच्या फेऱ्या वाढल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकाराची तातडीने सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे.

मंगळवारी (दि. ६) घेतलेल्या पत्रकार परिषदेत खडसे यांनी या प्रकरणावरून पोलिस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. स्थानिक गुप्तचर यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचा आरोप करत संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

खडसे यांच्या म्हणण्यानुसार, गोडसगाव, सावदा, निमखेडी मार्गे हतनूर धरण आणि त्यानंतर वरणगाव येथील डिफेन्स फॅक्टरी परिसरापर्यंत संशयित ड्रोनच्या फेऱ्या होत असल्याचे नागरिक व कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले आहे. रात्री उशिरापर्यंत या ड्रोनच्या हालचालींचा माग घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

या प्रकरणावरून खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही टीका केली. “माझ्या प्रसिद्धीसाठी ड्रोन लागत नाही, गिरीश महाजनांनी भान ठेवावे,” असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, हतनूर धरणाचे अभियंता एम. एल. पाटील यांनी या प्रकाराबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने संशयास्पद हालचाली जाणवल्याने गेल्या महिन्यात सावदा आणि वरणगाव पोलिस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आली होती, असे त्यांनी स्पष्ट केले.

तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन रात्री तसेच दिवसा प्रत्यक्ष पाहणी केल्याचेही पाटील यांनी सांगितले. हतनूर धरण आणि वरणगाव येथील डिफेन्स फॅक्टरीसारख्या संवेदनशील परिसरात ड्रोनच्या संशयित हालचालींची बाब समोर आल्याने या प्रकरणाची चौकशी आणि सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्याची मागणी जोर धरत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.