Contact Banner

मूर्तीची विटंबना आणि अपघात रोखण्यासाठी हायकोर्टात जाणार!


मूर्तीची विटंबना आणि अपघात रोखण्यासाठी हायकोर्टात जाणार!

शासनाला कायदेशीर नोटीस; गणेशमूर्तींच्या उंचीवर मर्यादा आणि स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी

लेवाजगत न्यूज उरण : सुनील ठाकूर :- 

गणेशोत्सवादरम्यान महाकाय मूर्तींमुळे होणारे अपघात तसेच विसर्जनानंतर मूर्तींची होणारी विटंबना रोखण्यासाठी आता कायदेशीर लढा उभारण्याची तयारी करण्यात आली आहे. यासंदर्भात पनवेलमधील नागरिक आणि श्री मार्तंड देवसंस्थान, जेजुरीच्या विश्वस्त सौ. नंदा प्रदीप राऊत यांनी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभाग, नगरविकास विभाग तसेच महावितरण प्रशासनाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

यावर्षी गणेशोत्सवाच्या काळात उंच मूर्ती कोसळण्याच्या काही दुर्घटना घडल्या. दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरात २२ फुटांची गणेशमूर्ती कोसळून दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा नोटीसमध्ये करण्यात आला आहे. याशिवाय राज्यातील विविध भागांत मूर्ती कोसळणे आणि विसर्जनाच्या वेळी निर्माण होणाऱ्या अडचणींच्या घटना समोर आल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

विसर्जनानंतर समुद्रकिनारे तसेच विविध जलस्रोतांच्या परिसरात भग्न मूर्तींचे अवशेष आढळणे, मूर्तींचे अवयव वेगळे होणे आणि त्या अवस्थेत मूर्ती पडून राहणे, या प्रकारांबाबतही नोटीसमधून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. धार्मिक भावना आणि पर्यावरणाच्या दृष्टीने या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

१० ते १२ फुटांची कमाल मर्यादा करण्याची मागणी

शासनाने पुढील १५ दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रासाठी सार्वजनिक गणेशमूर्तींच्या उंचीवर १० ते १२ फुटांची कमाल मर्यादा निश्चित करावी, अशी मागणी कायदेशीर नोटीसमधून करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक गणेश मंडळांसाठी मूर्तीचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट प्रमाणपत्र’ बंधनकारक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

विसर्जनानंतर मूर्तींचे पावित्र्य आणि सन्मान राखण्यासाठी ‘सन्मानपूर्वक विसर्जन व पुनर्संचयन नियमावली’ तयार करून ती राज्यभर लागू करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

नियमावली न झाल्यास जनहित याचिका

शासनाकडून या मागण्यांवर तातडीने ठोस निर्णय घेण्यात आला नाही, तर सार्वजनिक सुरक्षितता, धार्मिक भावनांचा आदर आणि मूर्तींची विटंबना रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल करण्याचा इशारा सौ. नंदा प्रदीप राऊत यांनी दिला आहे.

गणेशमूर्तींची सुरक्षित वाहतूक, प्रतिष्ठापना व विसर्जन यासाठी स्पष्ट आणि एकसमान नियमावली असावी, या उद्देशाने ही कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.