Contact Banner

यावल पोलिसांची कारवाई; देशी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त किनगाव परिसरात कारवाई; २५ वर्षीय तरुणाविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल

 

yawal-police-action-country-made-pistol-two-live-cartridges-seized-kingaon/

यावल पोलिसांची कारवाई; देशी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त

किनगाव परिसरात कारवाई; २५ वर्षीय तरुणाविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल

यावल | प्रतिनिधी | दि. ४ ऑक्टोबर -आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नाकाबंदी, गस्त आणि संशयितांच्या हालचालींवर देखरेख सुरू आहे. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी किनगाव परिसरातून एका २५ वर्षीय तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून देशी बनावटीचा लोखंडी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे यावल येथे नियुक्त पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे हे पथकासह गुन्हे प्रकटीकरणाचे काम करीत होते. त्यावेळी किनगाव येथील पवन सोनवणे हा देशी कट्टा बाळगत असल्याची माहिती त्यांना मिळाली.

गोरे यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि यावल पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना किनगाव परिसरात सापळा रचून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

हॉटेलसमोर सापळा; संशयित ताब्यात

पोलिसांनी संशयिताच्या हालचालींवर लक्ष ठेवून सापळा रचला. ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास यावल-चोपडा महामार्गावरील किनगावजवळील हॉटेल श्रीसमोर पवन कैलास सोनवणे (वय २५, रा. किनगाव बुद्रुक, ता. यावल, जि. जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले.

झडतीदरम्यान त्याच्याकडून लोखंडी देशी बनावटीचे पिस्तूल (कट्टा) आणि पॅन्टच्या खिशातून दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा

पोलीस कॉन्स्टेबल सचिन रघुनाथ धुळे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५६/२०२६ नोंदविण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ३ आणि २५(१-ब)(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस कर्मचारी सचिन धुळे व मयूर निकम, तसेच यावल पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक मेहबूब सय्यद आणि पोलीस कॉन्स्टेबल हितेश बागुल यांनी केली.

आरोपीला न्यायालयात हजर करणार

पवन कैलास सोनवणे याला अटक करण्यात आली असून, ४ ऑक्टोबर रोजी त्याला यावल येथील न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

शस्त्र बाळगण्यामागील उद्देशाचा तपास

जप्त केलेले शस्त्र आणि काडतुसे कोणत्या उद्देशाने बाळगण्यात आली होती, याचा तपास पोलीस करीत आहेत. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून संशयास्पद हालचालींवर देखरेख वाढविण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.