सावदा येथील रोजगार मेळाव्यात ३६ उमेदवारांची अंतिम निवड ७५ उमेदवारांचा सहभाग; ४ आस्थापनांचा सहभाग, महिला उमेदवारांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद
सावदा येथील रोजगार मेळाव्यात ३६ उमेदवारांची अंतिम निवड
७५ उमेदवारांचा सहभाग; ४ आस्थापनांचा सहभाग, महिला उमेदवारांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद
लेवाजगत सावदा : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि डॉ. केतकी पाटील फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सावदा नगरपालिकेच्या सहकार्याने मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी सावदा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेल्या या मेळाव्याला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्ष सुरेखाताई बोंडे होत्या. सावदा नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष रेणुकाताई पाटील यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेशभाऊ चौधरी, सावदा मंडळ अध्यक्ष दुर्गादासभाऊ पाटील, सावदा नगर परिषदेच्या गटनेत्या रंजनाताई भारंबे, नगरसेविका जयश्रीताई नेहाने, प्रतीक्षाताई भंगाळे, नगरसेवक सचिनभाऊ बऱ्हाटे, सारिकाताई चव्हाण, जाबीर बेग, बाजीराव ठाकरे, संजय माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
भारत माता व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश चौधरी यांनी केले, तर सूत्रसंचालन तालुका सरचिटणीस महेश अकोले यांनी केले.
या रोजगार मेळाव्यात ४ आस्थापनांनी सहभाग घेतला. एकूण ७५ उमेदवारांनी सहभाग नोंदविला असून त्यात ४४ पुरुष व ३१ महिला उमेदवारांचा समावेश होता. यापैकी ४८ उमेदवारांची प्राथमिक निवड झाली. त्यात ४० पुरुष व ८ महिला उमेदवार होते. अंतिम प्रक्रियेत ३६ उमेदवारांची निवड झाली असून त्यात २९ पुरुष व ७ महिला उमेदवारांचा समावेश आहे.
सावदा येथे प्रथमच रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला युवकांसह महिला उमेदवारांचाही लक्षणीय प्रतिसाद मिळाला. स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत