कीर्तनसेवा आणि गोसेवेचा गौरव! ह.भ.प.स्नेहलताई पाटील महाराजांना ‘नवरत्न पुरस्कार २०२६’ नाशिक येथे सन्मान; वयाच्या १७व्या वर्षापासून कीर्तनातून समाजप्रबोधनाचे कार्य
कीर्तनसेवा आणि गोसेवेचा गौरव! ह.भ.प.स्नेहलताई पाटील महाराजांना ‘नवरत्न पुरस्कार २०२६’
नाशिक येथे सन्मान; वयाच्या १७व्या वर्षापासून कीर्तनातून समाजप्रबोधनाचे कार्य
लेवाजगत न्यूज | नाशिक प्रतिनिधी – खेमचंद पाटील-
सामनेर : कीर्तनसेवा, समाजप्रबोधन आणि गोसेवेच्या माध्यमातून समाजात आध्यात्मिक व सांस्कृतिक मूल्यांचा प्रसार करणाऱ्या सामनेर येथील ह. भ. प. स्नेहलताई पाटील महाराज सामनेरकर यांना ‘नवरत्न पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. युनिटी फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट आणि अशोका कॅन्सर सेंटर (CCA) यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा सन्मान देण्यात आला.
ह. भ. प. स्नेहलताई पाटील महाराज या वयाच्या अवघ्या १७व्या वर्षापासून कीर्तनसेवेत कार्यरत आहेत. कीर्तनाच्या माध्यमातून संतविचार, अध्यात्म आणि वारकरी संप्रदायाच्या समृद्ध परंपरेचा प्रसार करत त्यांनी समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने सुरू ठेवले आहे. भक्ती, संस्कार आणि सेवाभाव ही मूल्ये जनमानसात रुजविण्यासोबतच त्या सामाजिक कार्य आणि गोसेवेतही योगदान देत आहेत.
शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या स्नेहलताईंनी आपल्या जिद्द, सेवाभाव आणि कीर्तनसेवेच्या बळावर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ‘नवरत्न पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले.
या गौरव सोहळ्याप्रसंगी त्यांचे वडील गुलाब नाना पाटील, आई मनीषा गुलाब पाटील तसेच प्रदीप पाटील (पाचोरा) उपस्थित होते. स्नेहलताईंना मिळालेल्या या सन्मानामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह सामनेर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सामनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा
स्नेहलताईंच्या या सन्मानामुळे सामनेर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील कीर्तनसेवा, समाजप्रबोधन आणि सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत