Contact Banner

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वासुदेव नेत्रालयाचा माणुसकीचा हात! वरणगावात १ ते ३० नोव्हेंबरदरम्यान शेतकरी व कुटुंबीयांची मोफत नेत्रतपासणी

 

vasudev-netralaya-free-eye-checkup-for-drought-affected-farmers-varangaon

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वासुदेव नेत्रालयाचा माणुसकीचा हात!

वरणगावात १ ते ३० नोव्हेंबरदरम्यान शेतकरी व कुटुंबीयांची मोफत नेत्रतपासणी

प्रतिनिधी | भुसावळ-

vasudev-netralaya-free-eye-checkup-for-drought-affected-farmers-varangaon


चालू वर्षातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी वरणगाव येथील ‘वासुदेव नेत्रालया’ने माणुसकीचे दर्शन घडविणारा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. दुष्काळग्रस्त शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी १ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत महिनाभर मोफत नेत्रतपासणी करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी बांधव आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत आर्थिक विवंचनेमुळे अनेकदा शेतकरी स्वतःच्या आरोग्याकडे, विशेषतः डोळ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन वासुदेव नेत्रालयाच्या संचालिका डॉ. रेणुका पाटील आणि डॉ. नी. तु. पाटील यांनी हा सामाजिक उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या उपक्रमांतर्गत केवळ शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची महिनाभर मोफत नेत्रतपासणी केली जाणार आहे. वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयात शेतकरी बांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. नी. तु. पाटील आणि डॉ. रेणुका पाटील यांनी केले आहे.

बळीराजासाठी सामाजिक बांधिलकीचा आदर्श

वासुदेव नेत्रालयाने यापूर्वीही विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली आहे. निवडणुकीच्या काळात मतदारांसाठी विशेष सवलती, प्रिस्क्रिप्शनवर समाजप्रबोधनपर संदेश तसेच विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवून नेत्रालयाने सामाजिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता दुष्काळाच्या कठीण परिस्थितीत शेतकरी बांधवांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुढाकार घेतल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

'निसर्गाने पाठ फिरवली, तरी आम्ही शेतकऱ्यांना साथ देऊ!'

याबाबत भावना व्यक्त करताना डॉ. रेणुका पाटील आणि डॉ. नी. तु. पाटील म्हणाले की, ज्या समाजात आपण लहानाचे मोठे झालो, ज्या समाजामुळे आपल्याला नाव, प्रतिष्ठा आणि यश मिळाले, त्या समाजाप्रती आपलेही काही कर्तव्य आहे. याच सामाजिक जाणिवेतून दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. निसर्गाने पाठ फिरवली असली, तरी आम्ही आमच्या परीने शेतकऱ्यांना साथ देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

दुष्काळामुळे खचून न जाता शेतकरी बांधवांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि १ ते ३० नोव्हेंबरदरम्यान वासुदेव नेत्रालयात आयोजित मोफत नेत्रतपासणी उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नेत्रालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.