निवडणुकीच्या वादातून यावलमध्ये तरुणाला मारहाण; नगरसेवकासह चौघांविरुद्ध गुन्हा
निवडणुकीच्या वादातून यावलमध्ये तरुणाला मारहाण; नगरसेवकासह चौघांविरुद्ध गुन्हा
यावल | प्रतिनिधी-
यावल शहरातील विश्वज्योती चौकात निवडणुकीच्या वादातून २७ वर्षीय तरुणाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक सागर सुनील चौधरी यांच्यासह चार जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच परस्परविरोधी तक्रारींवरून दोन्ही गटांतील एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याची माहिती आहे.
पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, विश्वज्योती चौकातील रहिवासी दिनेश गोपाळ चौधरी (वय २७) हे गुरुवारी रात्री परिसरात असताना नगरसेवक सागर चौधरी तेथे आले. निवडणुकीत माझ्याविरोधात काम केल्याच्या कारणावरून त्यांनी दिनेश चौधरी यांच्याशी वाद घातल्याचा आरोप आहे.
या वादातून सागर चौधरी यांच्यासह सचिन रवींद्र चौधरी, अभिजीत विलास गुरव आणि प्रशांत अरुण गुरव यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यावेळी सागर चौधरी यांनी हातातील कड्याने दिनेश यांच्या डाव्या गालावर मारून दुखापत केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या दिनेश यांच्या आई-वडिलांनाही मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात नगरसेवकासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात परस्परविरोधी तक्रारींवरून दोन्ही गटांतील आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याचेही सांगण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुनील पाटील पुढील तपास करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत