२१ वर्षांनंतर पुन्हा जुळले मैत्रीचे ऋणानुबंध! उमेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या २००४-०५ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
२१ वर्षांनंतर पुन्हा जुळले मैत्रीचे ऋणानुबंध!
उमेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या २००४-०५ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
सिंगनूर (ता. रावेर), प्रतिनिधी : हेमंत चांदवे
दसनूर येथील उमेश्वर माध्यमिक विद्यालयात सन २००४-०५ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तब्बल २१ वर्षांनंतर शाळेतील मित्र-मैत्रिणी पुन्हा एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, तर मैत्रीचे ऋणानुबंध पुन्हा एकदा घट्ट झाले.
या स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक पी. टी. महाजन सर होते. यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांशी मनमोकळा संवाद साधत शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. वर्गातील धमाल-मस्ती, मित्रांसोबत घालवलेले आनंदाचे क्षण, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शाळेतील अविस्मरणीय प्रसंग यांची आठवण काढताना अनेक विद्यार्थी भावूक झाले.
२१ वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लोटल्यानंतर गुरुजन आणि मित्र-मैत्रिणींची झालेली भेट सर्वांसाठी आनंददायी आणि भावनिक क्षण ठरली. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शाळेप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी उपस्थित शिक्षक, माजी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याप्रती आदर व्यक्त करण्यात आला.
प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. जी. महाजन सर, पर्यवेक्षक आर. एल. तायडे सर तसेच सध्या कार्यरत असलेले शिक्षक-शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जागृती पाटील, राजेंद्र वाघ, प्रीती शिंदे, अविनाश गुरव आणि मयूर महाजन यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मयूर महाजन यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. जागृती पाटील यांनी केले, तर कांचन पाटील यांनी आभार मानले.
२१ वर्षांनंतर झालेली ही भेट केवळ स्नेहमेळावा नव्हती, तर बालपणीच्या आठवणी, गुरुजनांप्रती कृतज्ञता आणि आयुष्यभर टिकणाऱ्या मैत्रीचा अनमोल सोहळा ठरली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत