सावदेकर युवा मंचचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा; गुणवंतांचा होणार सन्मान! सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या सावदा परिसरातील गुणवंतांचा होणार गौरव; नृत्य, वेशभूषा आणि वक्तृत्व स्पर्धांचेही आयोजन
पुण्यात २९ नोव्हेंबरला सावदेकर युवा मंचचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा; गुणवंतांचा होणार सन्मान!
सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या सावदा परिसरातील गुणवंतांचा होणार गौरव; नृत्य, वेशभूषा आणि वक्तृत्व स्पर्धांचेही आयोजन
लेवाजगत न्यूज सावदा प्रतिनिधी : सावदा शहर व परिसरातील नागरिकांशी असलेले नाते अधिक दृढ व्हावे, जुन्या आठवणींना उजाळा मिळावा आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान व्हावा, या उद्देशाने सावदेकर युवा मंच, पुणे यांच्या वतीने रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.
हा स्नेहसंमेलन सोहळा सकाळी ९.३० वाजता एएमएस ग्रुप एम्प्रोस इंटरनॅशनल स्कूल, आयबीएमआर कॉलेज कॅम्पस, एमआयडीसी ब्लॉक 'सी', चिंचवड, पुणे येथे होणार आहे. या कार्यक्रमात सावदा येथील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान व सत्कार करण्यात येणार आहे.
यामध्ये सामाजिक कार्य, क्रीडा क्षेत्र, शैक्षणिक गुणवत्ता, स्पर्धा परीक्षा व प्रशासकीय सेवा, वैद्यकीय शिक्षण तसेच इतर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा समावेश करण्यात आला आहे. इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत ९५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये विशेष यश मिळविणारे खेळाडू, IIT, JEE, GATE, UPSC व MPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणारे विद्यार्थी तसेच MBBS व MD शिक्षणात विशेष यश मिळविणाऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. आशाताई रघुनाथ पाचपांडे, श्रीमती शैलजा रविंद्र पाटील, डॉ. श्री. संदीप रघुनाथ पाचपांडे, अमोल रविंद्र पाटील, संजय महाजन सर, शामकांत पाटील व प्रवीण पाटील उपस्थित राहणार आहेत.
स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम, आपुलकीच्या भेटीगाठी, लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी मनोरंजनात्मक खेळ, विविध अॅक्टिव्हिटीज आणि सरप्राइजेसचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय नृत्य स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धाही आयोजित करण्यात येणार आहेत. वक्तृत्व स्पर्धेसाठी तीन मिनिटांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला आकर्षक ट्रॉफी व भेटवस्तू देण्यात येणार आहेत.
कार्यक्रमात उपस्थितांसाठी वरण-बट्टी, वांग्याची भाजी आणि आमसूल कढी अशा रुचकर मेजवानीचीही व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नसून, स्वेच्छेने देणगी देऊ इच्छिणाऱ्यांना देणगी देता येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
नृत्य, वेशभूषा व वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणीची अंतिम तारीख २० नोव्हेंबर २०२६ आहे. अधिक माहितीसाठी मीनल चौधरी (९९७०७८२१५१), हर्षला राणे (९५१८३१६४९३) आणि चंचल बेंडाळे (७८४१९०६७६५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सावदा शहर व परिसरातील गुणवंतांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासोबतच नव्या पिढीला प्रेरणा देणारा आणि पुण्यातील सावदेकर बांधवांना एकत्र आणणारा हा स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार पडणार आहे. पुणे येथे वास्तव्यास असलेल्या सर्व सावदेकर कुटुंबीयांनी सहकुटुंब व सहपरिवार उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन सावदेकर युवा मंच, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत