यावलमध्ये २० वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; पतीविरुद्ध वडिलांची पोलिसांत तक्रार
यावलमध्ये २० वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; पतीविरुद्ध वडिलांची पोलिसांत तक्रार
चारित्र्याच्या संशयातून छळ व मारहाणीचा आरोप; आयशा नगरमधील तिरुपती नगर परिसरातील घटनेने खळबळ
यावल लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-
यावल शहरातील आयशा नगर भागातील तिरुपती नगर परिसरात २० वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना २ नोव्हेंबर रोजी समोर आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मृत विवाहितेच्या पित्याने पतीविरुद्ध गंभीर आरोप करत यावल पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरत येथील रहिवासी सय्यद अकबर सय्यद छोटू यांच्या मुलीचा विवाह डिसेंबर २०२५ मध्ये यावल येथील फरीद खान याच्याशी झाला होता. विवाहानंतर ती पतीसोबत सासरी राहत होती. तिचा पती सोलर टेक्निशियन म्हणून काम करत होता.
दरम्यान, २ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास विवाहितेच्या पित्याला सासरच्या मंडळींकडून फोनद्वारे मुलीच्या मृत्यूची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच ते यावल येथे पोहोचले. त्यावेळी मुलीचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
तक्रारदार पित्याच्या म्हणण्यानुसार, मुलीच्या कौटुंबिक परिस्थितीबाबत तसेच तिच्या मृत्यूबाबत त्यांना संशय निर्माण झाला होता. यासंदर्भात सासरच्या मंडळींकडे विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच मृत विवाहितेच्या शरीरावर जखमांच्या खुणा असल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. चारित्र्याच्या संशयातून मुलीचा छळ व मारहाण करण्यात आल्याचा आरोपही पित्याने केला आहे.
घटनेनंतर विवाहितेचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरू केली. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी वैद्यकीय तपासणी आणि पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.
या प्रकरणी मृत विवाहितेच्या पित्याने यावल पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊन घटनेची सखोल चौकशी करण्याची तसेच दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या विवाहितेचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे वैद्यकीय अहवाल आणि पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत