Contact Banner

नदीपात्रात रेती उपसणारा भूषण ठाकरे बनला KBC चा करोडपती! सात कोटींच्या प्रश्नापर्यंत मारली मजल ‘काहीतरी बनल्याशिवाय घरी जाणार नाही’ हा निर्धार ठरला यशाचा पाया; एक कोटी रुपये आणि चारचाकी गाडी जिंकत रचला इतिहास

 

bhushan-thakare-kbc-one-crore-raver-jalgaon

नदीपात्रात रेती उपसणारा भूषण ठाकरे बनला KBC चा करोडपती! सात कोटींच्या प्रश्नापर्यंत मारली मजल

‘काहीतरी बनल्याशिवाय घरी जाणार नाही’ हा निर्धार ठरला यशाचा पाया; एक कोटी रुपये आणि चारचाकी गाडी जिंकत रचला इतिहास

लेवाजगत जळगाव : प्रतिकूल परिस्थिती, गरिबी आणि संघर्ष यांवर मात करण्यासाठी जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाली, तर यशाचे शिखर गाठता येते, याचा प्रत्यय बलवाडी (ता. रावेर, जि. जळगाव) येथील भूषण ईश्वर ठाकरे यांच्या यशातून आला आहे. लोकप्रिय दूरचित्रवाणी कार्यक्रम ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) मध्ये एक कोटी रुपये आणि चारचाकी गाडी जिंकण्याची कामगिरी भूषण यांनी केली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी सात कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत मजल मारली आहे. त्यांच्या या यशामुळे जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांचा संघर्षमय प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

भूषण यांचा हा प्रवास अत्यंत संघर्षमय राहिला आहे. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या भूषण यांना लहानपणापासूनच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना नदीपात्रात रेती उपसण्याचे कामही करावे लागले. मात्र, परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यांनी शिक्षणाची आवड आणि मोठे स्वप्न पाहण्याची उमेद कधीही सोडली नाही.

आयुष्याला कलाटणी देणारी भेट

भूषण यांच्या जीवनाला नवी दिशा मिळाली ती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, भुसावळ येथील अधीक्षक कुंदन पाटील यांच्या भेटीनंतर. भूषण यांची कौटुंबिक परिस्थिती आणि त्यांच्यातील सुप्त गुण, बुद्धिमत्ता व गुणवत्ता ओळखून कुंदन पाटील यांनी त्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश घेऊन शिक्षणाच्या प्रवाहात पुढे जाण्यास प्रोत्साहित केले.

केवळ वसतिगृहात प्रवेश मिळवून देण्यापुरती त्यांची भूमिका मर्यादित राहिली नाही. भूषण यांच्यातील क्षमता ओळखून त्यांनी सातत्याने मार्गदर्शन केले. आत्मविश्वास निर्माण केला आणि मोठे ध्येय गाठण्यासाठी प्रोत्साहन दिले. योग्य वेळी मिळालेल्या या पाठबळामुळे भूषण यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली.

‘काहीतरी बनल्याशिवाय घरी जाणार नाही!’

भूषण यांच्या जिद्दीची प्रचिती त्यांच्या एका निर्णयातून येते. शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना तब्बल दीड वर्ष त्यांनी एकदाही घरी जाणे टाळले. ‘काहीतरी बनल्याशिवाय मी घरी जाणार नाही,’ असा ठाम निर्धार त्यांनी वसतिगृहाचे अधीक्षक कुंदन पाटील यांच्यासमोर व्यक्त केला होता.

या एका वाक्यातून त्यांची ध्येयाप्रती असलेली निष्ठा, परिस्थिती बदलण्याची इच्छा आणि कुटुंबासाठी काहीतरी मोठे करून दाखविण्याची महत्त्वाकांक्षा स्पष्ट होते. स्वतःचे भविष्य घडविण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट आणि केलेला त्याग अखेर सार्थ ठरला.

एका संधीने बदलले आयुष्य

एकेकाळी उदरनिर्वाहासाठी नदीपात्रात कष्टाची कामे करणारे भूषण आज देशातील लोकप्रिय दूरचित्रवाणी कार्यक्रमाच्या मंचावर पोहोचले आहेत. ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉटसीटवर बसून एक कोटी रुपयांची रक्कम आणि चारचाकी गाडी जिंकण्याची कामगिरी त्यांनी केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी सात कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत मजल मारली.

भूषण यांचे हे यश केवळ वैयक्तिक मेहनत आणि बुद्धिमत्तेचा विजय नाही, तर गरजू विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता ओळखून त्यांना योग्य संधी आणि मार्गदर्शन दिल्यास त्यांच्या आयुष्यात किती मोठा बदल घडू शकतो, याचेही जिवंत उदाहरण आहे.

वसतिगृह ठरले स्वप्नपूर्तीचे व्यासपीठ

भूषण यांच्या यशामुळे शासकीय वसतिगृहांची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. वसतिगृह म्हणजे केवळ विद्यार्थ्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था नसून, त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि वैयक्तिक विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करणारे केंद्र आहे.

योग्य मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि संधी मिळाल्यास आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थीही यशाची मोठी भरारी घेऊ शकतात, हे भूषण ठाकरे यांनी सिद्ध करून दाखविले आहे. नदीपात्रातील कष्टापासून ते KBC च्या मंचावरील करोडपती होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रत्येक संघर्ष करणाऱ्या तरुणाला नवी प्रेरणा देणारा आहे.

भूषण यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल बलवाडी गावासह रावेर तालुका आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन करणारे कुंदन पाटील यांचेही सर्वत्र कौतुक होत आहे.

लेवा जगत न्यूज परिवारातर्फे भूषण ईश्वर ठाकरे यांचे कोटीच्या कोटी अभिनंदन! त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.