Contact Banner

मुक्ताईनगरच्या तरुणावर वरणगावात गोळीबार; सरफराज सय्यद गंभीर जखमी कामानिमित्त वरणगाव परिसरात आलेल्या तरुणाला लक्ष्य; गोळीबार करणारा संशयित फरार

 

muktainagar-youth-sarfaraz-sayyad-firing-varangaon

मुक्ताईनगरच्या तरुणावर वरणगावात गोळीबार; सरफराज सय्यद गंभीर जखमी

कामानिमित्त वरणगाव परिसरात आलेल्या तरुणाला लक्ष्य; गोळीबार करणारा संशयित फरार

वरणगाव | प्रतिनिधी

वरणगाव येथे गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुक्ताईनगर शहरातील काजीपुरा परिसरातील रहिवासी सरफराज सय्यद (वय २३) या तरुणाला लक्ष्य करून गोळीबार करण्यात आला. या घटनेत सरफराज गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने उपचारासाठी हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सरफराज सय्यद हा डंपर चालक म्हणून काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. कामाच्या निमित्ताने तो वरणगाव परिसरात आला होता. याचदरम्यान अचानक त्याच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. गोळीबारानंतर संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, सरफराजवर गोळीबार नेमका कोणी आणि कोणत्या कारणातून केला, याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही. वैयक्तिक वाद, पूर्ववैमनस्य की अन्य काही कारण, याबाबत विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. मात्र, पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

या घटनेची माहिती मुक्ताईनगर शहरात समजताच काजीपुरा परिसरासह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. एका तरुणावर अशा प्रकारे गोळीबार झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन गोळीबार करणाऱ्या संशयिताचा शोध घ्यावा आणि घटनेमागील कारणांचा तातडीने उलगडा करावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, पोलिस तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.