Contact Banner

शेळगाव बॅरेजमध्ये बुडालेल्या व्यक्तीचा तब्बल ७२ तासांनंतर आढळला मृतदेह भुसावळ बचाव पथकाच्या अथक प्रयत्नांना यश; तापी नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढला

 

shegaon-barrage-drowned-man-body-found-after-72-hours

शेळगाव बॅरेजमध्ये बुडालेल्या व्यक्तीचा तब्बल ७२ तासांनंतर आढळला मृतदेह

भुसावळ बचाव पथकाच्या अथक प्रयत्नांना यश; तापी नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढला

यावल : तालुक्यातील टाकरखेडा गावाजवळील शेळगाव बॅरेज प्रकल्पाच्या पुलावरून तापी नदीच्या पाण्यात उडी घेतलेल्या व्यक्तीचा तब्बल ७२ तासांनंतर मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आले. शुक्रवारी सकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

मृत व्यक्तीचे नाव राजू शिवाजी नेरकर (वय ५३, रा. जळगाव) असे आहे. मंगळवारी, २४ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ९ वाजता ते दुचाकीने शेळगाव बॅरेजच्या पुलावर आले होते. त्यांनी पुलावर दुचाकी उभी करून काही कागदपत्रे, ओळखपत्र आणि चिठ्ठी ठेवली. त्यानंतर त्यांनी तापी नदीच्या पाण्यात उडी घेतली होती.

घटनेची माहिती मिळताच शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र, दोन दिवसांच्या प्रयत्नांनंतरही मृतदेहाचा शोध लागत नव्हता. अखेर शुक्रवारी सकाळी भुसावळ नगरपालिकेच्या शोध व बचाव पथकाने बोटीच्या साहाय्याने शोधमोहीम राबवली. या मोहिमेत नदीपात्रातील खोल पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

मुख्याधिकारी जनार्दन पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख नरवीरसिंग राठोड आणि पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ अग्निशमन दलाचे गजेंद्र जावळे, हितेश सपकाळे, गौरव सपकाळे, गज्जू सावकारे, समाधान पाटील यांच्यासह हवालदार उमेश सानप, उमेश महाजन यांनी शोधकार्यात सहभाग घेतला.

पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.